Ad will apear here
Next
कायापालट...


... पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याच्या छातीत कळ आली. तेव्हा नेमका तो किंचित जाग्या आणि किंचित झोपाळलेल्या अवस्थेत असावा, त्याच्या लक्षात आलं... काही तरी विचित्र घडलंय खरं... तो जागा झाला आणि त्याच्या लक्षात आलं, की हे जागं होणं काहीतरी निराळंच आहे हो... त्याचं शरीर कापसासारखं हलकं झालं होतं... तो अलगद उठला आणि त्याने बघितलं, तर त्याचा देह शांतपणे झोपलेल्या अवस्थेत पडून होता. शेजारी बायको झोपलेली होती. बाजूच्या खोलीत दोन्ही मुलं होती... ओह... म्हणजे झोपेतच कारभार आटोपलाय बहुतेक आपला... तो शांतपणे दरवाजाबाहेर आला... दरवाजा कडेकोट बंद असला, तरी त्याला अटकाव झालाच नाही. तो बाहेर अंगणात आला. सहा वाजत होते, झुंजूमुंजू झालं होतं. समोरच्या घरात दूधवाला गेटबाहेर आलेला दिसला, याने हाक मारली, ‘यादव... कैसे हो’ शब्द उमटले नाहीतच. त्यामुळे यादवच्या कानावर पडणं अवघड होतं... तो अंगणातल्या तुळशीशेजारच्या कट्ट्यावर येऊन बसला... 

आता काही मिनिटांत बायको उठेल... मग त्याला उठवेल... तो काही उठणार नाही... आणि मग घरात आक्रोश सुरू होईल. पहिला फोन दादाला करेल, मग तिच्या बहिणीला... मग सुजय, विक्रांत, डॉ. देवस्थळी येतील... डीसी देतील... आज संध्याकाळपर्यंत सगळं संपेलही... तो अतिशय निराश झाला होता... मृत्युपत्र केलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्या मनात आलं... नाशिकच्या जमिनीचं काम अर्धवटच झालं, नेहरूनगरचा फ्लॅट बायकोच्या नावावर करून द्यायचा होता... असो... आता खूप उशीर झालाय... बायको उठली, त्याच्या लक्षात आलं... बराच वेळ झाला तरी घरात शांतताच होती... त्याला आश्चर्य वाटलं... त्याने चाहूल घेतली, तर घरातून हास्यविनोद सुरू आहेत असं जाणवलं. तो चक्रावलाच... अरे, कुणी मला उठवलंच नाही काय? तो आत डोकावला आणि समोरचं दृश्य बघून थक्क झाला... 

डायनिंग टेबलवर तो आणि बायको दोघे चहा घेत बसले होते... तो तोच होता, स्वत:..... इंपॉसिबल... व्हॉट इज धिस? हे कसं शक्य आहे? अरे मी इथे आहे... मग माझ्या देहात हा कोण? कोण असेल हा उपटसुंभ? अगदी माझ्याच थाटात पायावर पाय घेऊन आणि पायाचा अंगठा किंचित मुडपून माझ्यासारखाच बसलाय. हसता हसता हातवारेही माझ्यासारखेच? बोलता बोलता उजवी भुवई किंचित वर घेऊन बोलणं? हेही माझ्यासारखंच? कसं शक्य आहे? तो विचारमग्न झाला... इतक्यात त्याच्या पाठीवर एक हात येऊन पडला... अतिशय सौम्यपणे... त्याने मागे वळून बघितलं तर एक उंचापुरा मनुष्य उभा होता... पांढरेशुभ्र कपडे घातलेला... 

‘नमस्कार, मी चित्रंदेव... तुमचा सोल मेन्टॉर... बघताय ना गंमत? ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:’ची गंमत!’
‘हो; पण हे कसं शक्य आहे हो? काय नाव म्हणालात चित्रंगद साहेब,’ तो म्हणाला.

‘शक्य आहे की... आम्हाला सगळं शक्य आहे... आम्हाला म्हणजे नियतीला हो...’ चित्रंदेव म्हणाले, ‘आता हे जे तुम्ही बघताय ना याला कायापालट म्हणतात... म्हणजे कायेचा पालट... तुम्हाला मोक्ष, जन्म-मृत्यू या संकल्पना परिचयाच्या असतात; पण कायापालट परिचयाचा नसेल, नाही का? आता बघा मिस्टर देवव्रत गोडबोले साहेब... तुमच्या देहात या क्षणी जो आहे तो... त्याचं देहनाम आहे अताउल्लाह... अताउल्लाह अब्रार... सीरियाचा नामचीन टेररिस्ट आहे तो. आजवर असंख्य लोकांना कंठस्नान घातलंय त्याने.. दुष्ट आणि क्रूरकर्मा... मागच्याच आठवड्यात अमेरिकेच्या तीन पत्रकारांना हालहाल करून मारलंय त्याने... पण नियतीने त्याच्या नशिबात शांत मृत्यू लिहिला आहे... त्याच्या मागच्या जन्मांतील काही सत्कृत्यांमुळे... आणि तुमच्या मागच्या जन्मांतील काही दुष्कृत्यांमुळे तुमच्या नशिबात एक खतरनाक मौत आहे लिहिलेली... जी या देवव्रत गोडबोले या नामधारी देहात, कर्जतसारख्या शहरात घडवून आणणं आम्हाला जरा अवघड होतं... म्हणजे अशक्य नव्हतं, अवघड होतं... मॅट्रिक्समध्ये बऱ्याच उलथापालथी घडवून आणाव्या लागल्या असत्या... म्हणून आम्ही कायापालट केला... कायेचा पालट... अताउल्लाहचा आत्मा तुमच्या देहात आणि आता तुमचा अताउल्लाहच्या देहात घालणार आहोत... चेंज... कायापालट...’

‘पण... माझ्या मनातले विचार.. स्मृती... माझ्या सवयी... आणि मी त्याच्या सवयी कशा आत्मसात करेन?’ तो म्हणाला.

‘सवयी, स्मृती, आवडीनिवडी या देहातील मेंदूत असतात स्टोअर केलेल्या... कोणताही आत्मा तिथे कनेक्ट झाला, की मेंदूशी आम्ही कनेक्शन जोडून देतो... ते एकदा झालं, की सगळं आपोआप आत्म्यात डाउनलोड होतं.. फार अवघड नाहीये ते.’ चित्रंदेव.

‘पण...’ तो.

‘पण नाही नि बिण नाही... चला लवकर... तिथे सीरियात अताउल्लाहचा देह जास्त काळ निष्प्राण अवस्थेत ठेवता येणार नाहीये... कम ऑन,’ चित्रंदेव म्हणाले... आणि पुढच्याच क्षणात त्याचा आत्मा अताउल्लाहच्या देहात प्रकट झाला... पुढच्याच क्षणी रात्री टाइट जेवलेल्या सीरिअन मटणाची ढेकर आली.. तो दचकला... पुढच्याच क्षणी सावरला... आता तो देवव्रत गोडबोले नव्हता... आता तो होता अताउल्लाह अब्रार... शेजारी झोपलेली अप्सरेसारखी दिसणारी त्याची बायको होती उस्मा... तिच्या पलीकडे झोपलेली त्याची दोन गोड मुलं जोराम आणि निझार... तो जागा झाला... आणि लांबवर गोळीबाराच्या फैरी झाडल्याचे आवाज आले... याचा अर्थ अमेरिकन सैनिकांनी हल्ला केला होता तर? या क्षणी जीव वाचवून सगळ्यांना घेऊन पळणं गरजेचं होतं... त्याने मुस्तफाला फोन लावला आणि उस्मा व पोरांना जागं केलं..... गोळीबार उत्तरेकडून होत होता म्हणजे आता दक्षिणेकडे पळायला हवं होतं... तिथे उस्मान आणि तौफिकच्या टोळ्यांमध्ये आसरा मिळण्याची शक्यता होती... आपण वाचू शकतो का? त्याच्या मनात आलं... 

पण त्या क्षणी त्याच्याजवळच उभे असलेले चित्रंदेव आणि त्यांच्या मागे उभी असलेली अदृश्य नियती विकटपणे हसत होती... 

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MWINCR
Similar Posts
शून्यागार... ‘सगळे खालच्या हॉलमधून इकडे तिकडे जातायत आणि मग मीच इकडे कसा? हाच प्रश्न आहे ना तुम्हाला विचारायचा?’ ती हसली... त्याने कॉफीचा घोट घेत हसून होकारार्थी मान डोलावली. मग ती काहीच बोलली नाही...त्याची कॉफी संपेपर्यंत ती वाट बघत होती. याक्षणी सबंध लाउंजमध्ये कोणीही नव्हतं... इतक्यात एक दुसरी अटेंडंट आली... हिने तिला सूचना दिली
सत्य...??? ...तो आणि त्याची बायको दोघेच होते प्रवासात आज. नशिबाने आज मुलं सोबत नव्हती. कार संथ वेगाने सुरू होती. वेग संथ ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. कारण, बाहेर पावसाचं धुमशान सुरू होतं. परतीच्या पावसाचा जोर कमालीचा वाढला होता. विजांचा गडगडाट होताच... आणि एका वळणावर वळताना पुढच्या क्षणी काय झालं ते समजलं नाही. गाडी एका अजस्र वृक्षावर जाऊन आदळली
महाशिवरात्री... अद्भुत अनुभूती.. किरव्याचा पाडा....माझ्या घरापासून काही किलोमीटर असला, तरी दर महाशिवरात्रीला मी हमखास जातोच... मी हाडाचा शिवभक्त आहे. किरव्याचा पाडा या लहानशा गावातलं ते जागृत शिवमंदिर...गेली कित्येक वर्षे मी आवर्जून जातो. महाशिवरात्रीला तिथे जाण्यामागची अनेक कारणं आहेत. त्यापैकी दोन मुख्य कारणं म्हणजे, ते देवस्थान
येरझारा... तो शांतपणे बेडवर पहुडला होता. वय वर्षे ८५, थकलेलं शरीर, थकलेली गात्रं... व्हेंटिलेटरची बीप बीप सुरू होती... आणि त्याचे डोळे मिटू लागले... त्याच्या डोळ्यांसमोर साकार झालं एक दृश्य.. तो तिसरीत असेल कदाचित, रस्त्यावरून जाताना काळ्या जांभळीपाशी सटकन चपलेचा अंगठा तुटला होता... च्यायला, नेमकं आजच... खिशात बघितलं तर आईने दिलेले चार आणे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language